शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

अर्ध्या वाटेवर


घरातून निघताना आपल्याला कुठे जायचंय हे माहिती नाही असं नसतंच ना! अगदीच डोकं भिरभिरलंय आणि काय करावं सुचत नाही असा एखादा आणि तेही क्वचितच निघत असेल घरातून कुठे जायचंय हे न ठरवता, किंवा वाटेतच ठरवत असेल कुठे जायचं ते. काहीजण प्रवासाची जागेवर पोहोचण्यापेक्षा जास्त मजा लुटतात तर काही इच्छित स्थळी पोहोचण्यावर जास्त लक्ष देतात आणि प्रवासाला कंटाळवाणं मानतात. 

प्रवासाची मजा लुटता येईल नक्कीच पण रोजच्याच प्रवासाचा आनंद कोणी घेतो का? ऑफिस दहा किलोमीटरवर आहे आणि ट्रॅफिकमुळे रोज पोहोचायला दीड दीड तास लागत असेल तर तो काय बिचारा प्रवासाची मजा घेणार? त्याच्यासाठी तर कधी एकदा ऑफिसला किंवा घरी पोहोचतो असंच होणार ना. मग कोणी कितीही सांगितलं की "the journey is always better than the destination" तरी काय फरक पडतो!

आयुष्य हा प्रवासच आहे असं सगळेच म्हणतात, पण असा प्रवास की ज्याचं खरंखुरं गंतव्यस्थळ कोणालाच नको आहे. रोजचाच झालाय हाही प्रवास. कधी आपण जागेवर पोहोचलो असं वाटतच नाही. आज काही मिळालं तर उद्या आपला जीव दुसरं काहीतरी मिळवण्याच्या मागे. शांत, निवांत कधी वाटतच नाही. आपण कायमच आपले कोणत्यातरी गोष्टीच्या अर्ध्या वाटेवरच !

आयुष्य हा प्रवास आहे म्हणण्यापेक्षा आपला प्रत्येक दिवस हेच आपलं destination आहे असं मानलं तर कदाचित हे अर्ध्या वाटेवरचं जीव टांगणीला लागणं थोडं कमी होईल का ?



गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

२०२०

 २०२० चा रकाना तसाच रिकामा जाऊ नये म्हणून काहीतरी लिहायला हवंय. आयुष्यातलं अजून एक वर्ष संपतंय, पण आपल्याला नक्की काय हवंय आणि काय नकोय हे अजूनही समजत नाहीये. कधी येईल विचारांची इतकी परिपक्क्वता? कधी येईलच की नाही ते सुद्धा माहिती नाही. पण सोशल मीडिया पासून थोडा दूर गेल्यापासून जरा बरं वाटतंय.

उगीचच राजकारण, नसते वाद, कोणाच्या आयुष्यात कोणाचं काय चाललंय याचा कधी खरा तर कधी खोटा दिखावा या सगळ्यातून डोकं जरा बाजूला झाल्यामुळे चांगले विचार करण्यासाठी थोडा वेळ मिळत आहे. आपण बरं आणि आपलं आयुष्य बरं यातही बरंच सूख आहे हे समजतंय. अशाच अजून चांगल्या काही गोष्टी २०२१ मध्येही शिकायला मिळोत आणि सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही सदिच्छा!

गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

साचा

एखादी वस्तू नेहमी त्याच आकाराची आणि त्याच नक्षीची बनवायची असली की त्याचा साचा बनवणं जास्त सयुक्तिक ठरतं. असा साचा तयार असला की सगळी मेहनत वाचते आणि हवी ती वस्तू पटकन तयार होते. अशा एकसारख्या वस्तू आपल्या समोर असल्या की आपल्याला लगेच ओळखू येतं की या एकाच साच्यातल्या आहेत आणि मग त्या साच्याचा आकाराचा अंदाज आपल्या डोळ्यांसमोर येतो. आपल्या मनातही असेच कित्येक अदृश्य साचे बनवून तयार असतात. आपल्या समोर एखादी अनोळखी व्यक्ती आली की आपल्याकडच्या कोणत्या साच्यात ती व्यक्ती अचूक बसतेय याचा आपल्याकडून नकळत विचार केला जातो. 

समजा ती व्यक्ती स्त्री असेल तर तिने कसे कपडे घातले आहेत, कोणते दागिने घातले आहेत, कशी केशरचना केली आहे याकडे आपलं लक्ष जातं. जर या सगळ्या गोष्टी एकदमच साध्या किंवा आपल्या दृष्टीने जुनाट असतील तर आपला साचा म्हणतो, ही रूढी परंपरांना चिकटून राहणारी असावी, हिला इंग्रजी बोलता येत नसावं, ही उदारमतवादी नसावी वगैरे वगैरे. आणि याऐवजी याउलट पेहरावातली स्त्री आपल्यासमोर आली तर आपला साचा म्हणतो ही गृहकृत्यदक्ष नसावी, हिला घरातल्यांची काही काळजीच नसेल, ही स्वार्थी आणि स्वतःपुरतंच पाहणारी असेल, कदाचित उद्धटही असेल, तिला अहंगंड असेल आणि बरंच काही!

एखादी व्यक्ती अतिशय शुद्ध आणि प्रमाण भाषा किंवा फाडफाड इंग्रजी बोलत असेल तर नकळत आपण तिला ज्ञानी आणि सभ्य ठरवून टाकतो आणि तसं नसेल तर एखाद्याच्या बुद्धिमत्तेची कदर होतही नाही. एखाद्याला त्याच्या जाती-धर्मावरून तर एखाद्याच्या प्रांतावरूनही आपण ठरवून टाकतो की ही व्यक्ती अशी असेल म्हणून. असेच कित्येक साचे आपण लोकांच्या वागण्याबोलण्यावरूनही बनवत असतो. सगळ्यांनी एकमेकांना कोणत्याही साच्यात न घालता एक व्यक्ती म्हणून तुम्ही कसे आहात याची इतरांना ओळख व्हावी, म्हणूनच तर शाळा वगैरे अशा संस्थांमध्ये गणवेश असतात. 

पण असं किती वेळा झालं असेल ना की एखाद्याला पाहून त्या व्यक्तीबद्दल आपण मत बनवलं आणि प्रत्यक्षात ती व्यक्ती अगदीच वेगळी निघाली? आपल्यालाही हे माहितीच असतं की या सगळ्या गोष्टींवरून एखाद्याबद्दल मत बनवणं चुकीचं आहे, पण एखादं कोणीतरी अनोळखी पुन्हा कुठेतरी ओळखीचं होण्यासाठी आपल्याला दिसतं आणि परत आपण कोणतातरी साचा वर काढून त्याला त्यात बसवतो, आणि चांगला परिचय झाला की पुन्हा एकदा अजून एक साचा गळून पडतो. 

दैनिक गोवन वार्ता साठी केलेलं लिखाण..